नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर पडलेले खड्ड्यांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ने टोल कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. घोटी व पडघा या टोलनाक्यांवर रविवारपासून (दि.२०) पुढील ९५ दिवस कंत्राटदाराला टोलवसुलीस बंदी घालण्यात आली आहे. ही टोलवसुली प्राधिकरण करणार असून वसुलीच्या रक्कमेतून खड्डे बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चालूवर्षी मान्सूनने जोरदार हजेरीसाेबत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचा विषय राज्यभर गाजला. इगतपूरी तालूक्यातील गोंदे-वडपे (जिल्हा ठाणे) पर्यंत महामार्गाची अक्षरक्ष: चाळण झाली. परिणामी अडीच ते तीन तासांच्या प्रवासासाठी ८ ते ९ तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे महामार्गावरील खड्डे थेट विधीमंडळ अधिवेशनात गाजले. अनेक मंत्र्यांसह आमदारांनी रस्तेमार्गे प्रवास टाळून थेट नाशिकहुन रेल्वेमार्गेच मुंबई गाठण्यास सुरवात केली होती. दुसरीकडे महामार्गावरील खड्यांमुळे शरीराची हाडे खिळखिळी होतानाच वाहनांचे नुकसान होत असल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये रोष होता.
खड्यांच्या समस्येवरुन नाशिककरांनी आंदोलन उभारण्याची तयारी केली होती. दरम्यान माजी खासदार हेमंत गाेडसे यांनी घोटी टोलनाक्यावर आंदोलन करत कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी स्वतंत्र बैठका घेत खड्डे बुजविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. प्रसंगी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता थेट खड्यांच्या प्रश्नावरून कंत्राटदारावरच कारवाईचा बडगा उगारत ९५ दिवस टोलवसुलीला बंदी करण्यात आली. त्यामुळे उशिराने का होईना प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
७६ कोटींमधून दुरुस्ती
टोल कंत्राटदारावरील कारवाईबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. रविवारपासून (दि.२०) पुढील ९५ दिवस महामार्ग प्राधिकरण घोटी व पडघा टोलनाक्यावर वसुली करणार आहे. याकाळात सुमारे ७६ कोटी रुपयांचा महसुल गोळा होणार आहे. या निधीतून गोंदे ते वडपे या महामार्गाची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल.
