तहसिलदाराची बनावट सही, २९ लाख ६३ हजारांत सरकारलाच महसूल सहायकाने ‘कूळ’ दाखवले !जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी हर्षल पाटील फरार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर

जामनेर येथील तहसिलदारांच्या स्वाक्षरीचा बनावट पध्दतीने वापर करुन जामनेर मथील वर्ग २ ची शेतजमिन वर्ग १ मध्ये रुपांतर करुन शासनाचा २१ लाख ६३ हजार २८५ रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी जामनेर तहसिल कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी (कुळ कायदा) हर्षल विश्वनाथ पाटील यांच्या विरुध्द जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच हर्षल पाटील हा अधिकारी फरार झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी जामनेरचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या फिर्यादीवरुन हर्षल पाटील यांच्याविरुध्द जामनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या धक्कादायक प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जामनेर येथील गट क्र. ८३६/२ ही शेत जमिन मालक अर्जदार नाजीयाबी शेख सत्तार, शेख फरहान हिसामुद्दीन यांनी वर्ग २ प्रकाराची जमिन वर्ग १ प्रकारात व्हावी म्हणून तहसिलदार जामनेर यांना अर्ज सादर केला होता. त्यांच्या अर्जावरुन वर्ग २ ची शेत जमिन वर्ग १ मध्ये करण्यासाठी नजराणा भरणा आवश्यक होते. जमिनीचे बाजारमूल्य ४३ लाख २६ हजार ५७० रुपये एवढे आहे. त्यानुसार ५० टक्के नजराणा रक्कम म्हणून २१ लाख ६३ हजार २८५ रुपये शासकीय कोषागारात भरणा केल्याशिवाय जमिनीची नोंद अथवा रुपांतर वर्ग एक मध्ये करता येणार नाही, असा आदेश तहसिलदार जामनेर यांनी दिला. त्यांच्या आदेशावर अर्जदारांनी एवढी मोठी रक्कम आम्हाला ५० टक्के नजराणा भरणा शक्य नाही, असे लेखी कळविले.

त्यामुळे तहसिलदार जामनेर यांनी त्यांचा अर्ज निकाली काढला.

या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल पाटील यांनी फेरफार करुन तहसिलदार जामनेर यांचा स्वाक्षरीचा दुरुपयोग केला. तसेच नजराणा रकमेचा भरणा बँकेत केल्याचे बनावट दस्तावेज तयार केले. ही बाब तहसिलदार जामनेर यांच्या तपासणीत आढळून आल्यानंतर हर्षल पाटील याचे बिंग फुटले. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याचे व बनावट दस्ताऐवज केल्याचे कबूल करीत तहसिलदार जामनेर यांना विनंती केली. तथापी हे प्रकरण धक्कादायक आणि गंभीर असल्याने हर्षल पाटील यांच्या विरुध्द तहसिलदार जामनेर यांनी रितसर फिर्याद दाखल केली. त्यामुळे हर्षल पाटील विरुध्द विविध कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

error: Don't Try To Copy !!