
विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय गणवेश वाटप करून तोंडापूर विद्यालयात संस्था वर्धापन दिन उत्साहात संपन्न….
तोंडापूर येथील श्रीमती र. सु.जैन माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 81 वा वर्धापन दिन, एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी तसेच इतर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव पल्हाळ हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.रोनखेडे यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास व शाळेने वर्षभरात केलेली उज्वल कामगिरी आपल्या प्रास्ताविकातून सादर केली. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची मनोगते सादर करण्यात आली. त्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, भेटवस्तू व बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेतील खेळाडू व सीड्स बॉल तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.याप्रसंगी जामनेर येथील दातृत्व लाभलेले व्यक्तिमत्व महेंद्र सोनवणे व ज्योती सोनवणे या दांपत्याकडून सालाबाधाप्रमाणे वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना व शाळेतील इतर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना तब्बल 20 हजार रुपये किमतीचे गणवेश मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले. यावेळेस सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आलेला होता.स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष दिगंबर पाटील तसेच कुंभारी येथील माजी सरपंच सुरता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण नामदेव पल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.लोडते यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस.देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.