
मुख्याध्यापकाचा लाचखोरीचा प्रयत्न उधळला; लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकावर दुसऱ्यांदा कारवाई
निपाणे (ता. एरंडोल), जि. जळगाव | प्रतिनिधी संत हरिहर माध्यमिक विद्यालय, निपाणे येथील मुख्याध्यापकाने शाळेतील शिपायाकडून वैद्यकीय बिल मंजुरीसाठी ३६०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने या प्रकरणी सापळा कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नीच्या ₹२३,८१५/- रुपयांच्या वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५, रा. नेपाणे) यांनी ₹५,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ₹३,६००/- ठरली होती. या संदर्भात तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करत असताना मुख्याध्यापक महाजन यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाच स्वीकारण्यापूर्वीच विभागाने कारवाई करत आरोपीविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८५/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संदिप महाजन यांच्यावर वेतन निश्चितीच्या फरकाच्या ₹२,५३,७८०/- रुपयांवरून ५ टक्के लाचेची मागणी करून ₹१०,०००/- रु. स्वीकारल्याचा गुन्हा २७ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता (गु.र.क्र. १०५/२०२४). ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रदीप पोळ यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली