जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
