जामनेरमध्ये सरकारी तांदळाचा काळाबाजार उघड ?


255 क्विंटल तांदूळ भरलेला ट्रक ताब्यात; पुरवठा विभाग व पोलिसांची कारवाई, मात्र अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ
जामनेर : गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचा संशय पुन्हा एकदा बळावला आहे. जामनेर तहसीलच्या पुरवठा विभागाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 200 पेक्षा अधिक पोती तांदूळ वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूरहून पहूरच्या दिशेने जाणारा हा संशयित ट्रक जामनेर येथे अडवण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 255 क्विंटलपेक्षा अधिक तांदूळ आढळून आला. या तांदळाबाबत काही पत्रकारांनी हा साठा सरकारी रेशनिंगचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
कारवाईनंतर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी नारायण सुर्वे यांनी पंचनामा केला. मात्र हा तांदूळ नेमका कुठून आणण्यात आला?, कोणाकडून खरेदी करण्यात आला?,

आणि तो नेमका कुठे नेला जात होता? याबाबत अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, तहसीलदार आणि पुरवठा विभागाकडून अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केवळ “ही गाडी बुलढाणा येथून आली असून पाचोराच्या दिशेने जात होती,” एवढीच माहिती देण्यात आली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील तांदूळ साठ्याबाबत माहिती लपवली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, सरकारकडून रेशन कार्डधारकांना दर महिन्याला मोफत तांदूळ, गहू तसेच ज्वारीचे वाटप केले जाते. त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र अनेकदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नसल्याच्या तक्रारी समोर येतात. काही लाभार्थी धान्य घेण्यासाठी न आल्यास त्यांच्या हिस्स्याचे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत.
जामनेरमध्ये पकडण्यात आलेला हा मोठा तांदळाचा साठा नेमका सरकारी धान्याचा आहे का?, यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे?, आणि या प्रकरणात कोणकोण सामील आहे? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

error: Don't Try To Copy !!