जामनेर, प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधीस्थळी यात्रेची सांगता होणार आहे.
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, शिवकार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होणार आहेत.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर, शिवचरित्राचा प्रचार-प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे संवर्धन हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समन्वयक राहुल चव्हाण व कैलास पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून देणारी ही यात्रा राज्यभरातील शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
