डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा


प्रतिनिधी :जामनेर

बालविवाह रोखण्याचा आणि मुलींच्या हक्कांच्या संरक्षणाचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश

जळगाव : डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील जीएनएम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी १० ऑक्टोबर रोजी विकास विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला. या निमित्ताने बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे जनजागृतीपर नाट्य सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला विकास विद्यालयाचे प्राचार्य युवराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘बालविवाह संपवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा’ या संकल्पनेवर आधारित शैक्षणिक नाट्य सादर केले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर होणारे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात जीएनएम द्वितीय वर्षाच्या सर्व ४० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बालविवाहाला प्रतिबंध करणे, मुलींच्या अधिकारांविषयी जनजागृती करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे, हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी अंजू बुरघाटे यांनी केले, तर कुमारी प्रसन्नता वेले यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागप्रमुख प्राजक्ता सावरकर, व्याख्यात्या महेश्वरी बोंबळे व प्राजक्ता डाखोरे, तसेच ट्यूटर प्रिया खडसे, कीर्ती ढाले आणि सायली देशमुख उपस्थित होत्या.

मुलींच्या हक्कांचे संरक्षण, बालविवाहाचे निर्मूलन आणि प्रत्येक मुलीला शिक्षणासह समान संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.

— बातमी समाप्त —

error: Don't Try To Copy !!