जळगाव | प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. प्रेम गोपाळ धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे बोरनार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता. त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच प्रेम गावी आला होता. बुधवारी सायंकाळी गावातील एका लग्नसोहळ्यासाठी तो गेला असताना तेथे काही व्यक्तींशी त्याचा जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी प्रेम याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.

या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी प्रेमला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्नसोहळ्यात वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि या हल्ल्यात कोणाचा सहभाग होता, याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नसोहळ्यासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
JBN महाराष्ट्र NEWS तुमच्या गावापासून महाराष्ट्रापर्यंत…

