जळगांव :प्रतिनिधी
जळगाव :
शहरातील शास्त्रीनगर परिसरात महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या माधवराव उर्फ नंदूमामा माणिकराव देशमुख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप मृताचे पुत्र ओम देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधवराव देशमुख यांनी विविध खासगी फायनान्स कंपन्या, होमलोन तसेच काही खासगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते. त्यांच्यावर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी घरी येऊन दबाव टाकत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घरी येऊन धमक्या, फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप!
मृताचे पुत्र ओम देशमुख यांच्या आरोपानुसार, एका फायनान्स कंपनीचे चार ते पाच प्रतिनिधी एकाच वेळी घरी येऊन कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावत होते. तसेच फोनवरून संबंधित मॅनेजरशी बोलण्यास भाग पाडून शिवीगाळ केली जात होती आणि धमक्याही दिल्या जात होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. या कथित मानसिक छळामुळेच वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार!
या घटनेनंतर देशमुख कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
आता या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते आणि कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीप : फायनान्स कंपन्यांकडून कथित छळ झाल्याचे आरोप कुटुंबीयांनी केले असून, या आरोपांची अधिकृत पुष्टी आणि पोलिस तपासातील निष्कर्ष अद्याप स्पष्ट होणे आवश्यक आहे.
JBN महाराष्ट्र NEWS | जळगाव
बाईट : ओम देशमुख माधवराव देशमुख यांचे पुत्र
कर्जवसुलीसाठी घरी येऊन धमक्या देणे, फोनवरून शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देणे याबाबतचे कुटुंबीयांचे आरोप.
