जामनेर : आगामी जिल्हा परिषद निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील लिंहे मोरगाव गटातील राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. या गटातून श्री. विश्वनाथ इंदुल चव्हाण यांचे नाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चर्चेत आले असून, सोशल मीडियावर त्यांच्या कार्याचा आढावा मांडणारी पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या पक्षसंघटन, जनसंपर्क आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न विश्वनाथ चव्हाण यांनी केल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
प्रसारित करण्यात आलेल्या माहितीनुसार, लिंहे मोरगाव गटात पक्षबांधणी, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संघटन विस्तार, गावोगावी आरोग्य शिबिरे व प्रबोधन कार्यक्रम, आरोग्य क्षेत्रातील सेवा, शैक्षणिक मार्गदर्शन तसेच ग्रामीण युवकांना शिक्षण, क्रीडा व रोजगाराच्या संधींसाठी प्रोत्साहन अशा विविध कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.
याशिवाय, जामनेर येथील रुबी स्टार हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व शासकीय योजनांबाबत सहकार्य केल्याचाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिंहे मोरगाव गटात संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू होत असून, विश्वनाथ चव्हाण यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात कितपत पुढे जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मात्र, विश्वनाथ चव्हाण यांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसून, सध्या त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीत लिंहे मोरगाव गटातील राजकीय समीकरणे कोणते वळण घेणार आणि मतदार कोणाला पसंती देणार, हे निवडणुकीच्या पुढील घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे.









