JBN महाराष्ट्र NEWS
प्रतिनिधी जामनेर
जळगाव : वावडदा (JBN महाराष्ट्र NEWS प्रतिनिधी जामनेर ) येथील शासकीय किट वाटप केंद्रावर नुकत्याच झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतरही संबंधित केंद्र पुन्हा सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, लाभार्थ्यांची कथित लूट तसेच प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, दि. ४ जून २०२६ रोजी वावडदा येथील शासकीय किट वाटप केंद्रावर एसीबीने कारवाई करून १०० रुपयांची लाच स्वीकारताना एका तरुणीला अटक केली होती. तिच्याकडून २६ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील संबंधित मालक किंवा जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर आदी भागांतील केंद्रे बंद ठेवून केवळ वावडदा व धरणगाव केंद्रांवरच जिल्हाभरातील लाभार्थ्यांना केवायसीसाठी बोलावले जाते. केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे तीन फॉर्मसाठी १५० रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, लाभार्थ्यांना किटचे साहित्य त्याच दिवशी देणे अपेक्षित असताना त्यांना पुन्हा काही दिवसांनी बोलावून त्याच प्रक्रियेसाठी पुन्हा पैसे आकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही दलालांकडून घरपोच सेवेच्या नावाखाली प्रत्येकी ५०० ते १५०० रुपये वसूल केले जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात केंद्रांवरील सुविधांच्या अभावाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तासन्तास उभे राहावे लागत असून पिण्याचे पाणी, सावली किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
याशिवाय, संबंधित कंत्राटदाराला यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते, तरीही त्याच्याच माध्यमातून पुन्हा काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसीबी कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना काही केंद्रांवर वाटप प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन संतोष ज्ञानेश्वर पाटील, कैलास सुरेश ताडे, मंगल युवराज पाटील, प्रविण शिवाजी मराठे, जितेंद्र बारी व महबूब सिंग राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

