जळगाव : शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने यंदाच्या नवीन वर्षाच्या प्रवेशांमध्ये अगदी सुसूत्रता व काटेकोर धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले असल्याने स्थानिक स्तरावर शाळा-कॉलेज व संस्थानी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये,यासाठी शिक्षण सहसंचालक कार्यालयाने महाविद्यालय निहाय झोनल ऑफिसर नियुक्त करावे,अशी मागणी करत राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संयुक्तरित्या प्रशासनाला साकडे घातले आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्यक्रम संयोजक तथा रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेक ठाकरे,जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज,१५ जून (सोमवार) रोजी येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.पराग मसराम व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांची भेट घेऊन यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या सुटसुटीत व पारदर्शक धोरणाची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी निवेदन देत मागणी केली.

याबाबत व्हावी काटेकोर अंमलबजावणी :
१. शासनाने ०४ जानेवारी २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येऊ नये,अशा स्पष्ट सूचना असताना जिल्ह्यातील काही संस्था विद्यार्थ्यांकडून २०० ते ५०० रुपये घेत असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तक्रारी आल्या असल्याने अशा प्रकारचे बेकायदा पैसे वसुल करू नये असे जिल्ह्यातील सर्व संस्थांना तात्काळ आदेश व्हावेत.
२. शासनाने ०८ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक,सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा १०० टक्के लाभ मंजुरीचा निर्णय झालेला असल्याने म्हणजे सरसकट मोफत शिक्षण मिळणार असल्याने प्रवेशावेळी मुलींना शुल्कासाठी वेठीस धरण्यात येऊ नये.
३. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मागणीप्रमाणे गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजनेप्रमाणे मुलींना सरसकट मोफत प्रवेश देण्याच्या संदर्भात त्या-त्या महाविद्यालयांसाठी ‘नोडल ऑफिसर’ नेमण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी.याबाबत केलेल्या कार्यवाहीची महाविद्यालय निहाय नेमण्यात आलेल्या झोनल ऑफिसरची माहिती सर्वांना सोयीसाठी जाहीर करण्यात यावी अशी मागणी दोन्ही विभागाशी निगडित अधिकाऱ्यांकडे पदाधिकाऱ्यांनी केली.
शिष्टमंडळात यांचा होता सहभाग :
शिक्षण विभागाच्या दोन्ही कार्यालयांच्या प्रमुखांशी बैठक करतांना सकलीन शेख रफिक,प्रांजल सुनील सोनार,श्रद्धा छगन सोनवणे,मानसी भास्कर ठाकरे,प्रिन्सि राकेश दारा,कीर्ती अरुण कुलकर्णी आदी
विद्यार्थ्यांचा शिष्टमंडळात सहभाग होता.

