जामनेर न्यायालयात विधी सेवा व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

जामनेर : तालुका विधी सेवा समिती जामनेर व तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, जामनेर येथे 19 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता विधी सेवा शिबिर तथा कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माननीय श्री. एम. एन. जैस्वाल उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अनिलदादा सारस्वत, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. एन. देशमुख, अध्यक्ष श्री. के. पी. बारी, सचिव ॲड. डी. बी. गोतमारे यांच्यासह अनेक विधीज्ञ उपस्थित होते.

कार्यक्रमात ॲड. एन. टी. चौधरी यांनी उपस्थित पक्षकारांना ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसंदर्भातील कायद्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. डी. व्ही. राजपूत यांनी केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. यानंतर सरकारी वकील ॲड. शेळके यांनी अंमली पदार्थांशी संबंधित कायदे आणि त्याचे सामाजिक परिणाम याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश माननीय वाय. एस. आखरे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा तसेच विविध विधी सेवा योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शक भाषणाने शिबिराचा समारोप झाला.

या शिबिरास जामनेर तालुका वकील संघाचे सर्व विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. उपस्थितांनी शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

error: Don't Try To Copy !!