
सोयगाव / जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
…..
देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर गेट या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत व गेटसमोर साचलेल्या घाणीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वारंवार अर्ज करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत सोयगाव व पंचायती समितीकडून देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मुख्य रस्त्याने संपूर्ण गावची ये-जा असून रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, चक्रधर स्वामी मंदिर गेटसमोर मोठ्या प्रमाणात घाण-कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
या सर्व बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास येत्या २४ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भारत नप्ते, संदीप काळे, अभय पुजारी, बारकू गावडे, घनश्याम शिंदे, राहुल पुजारी, गोपाल कुरंकार, शुभम पुजारी, आकाश कळसकर, राहुल न्हावी, प्रदिप काळे, संजय गिरी, गोपाल गाडवे, प्रशांत ठिकाणी, योगेश गायकवाड, संजय काळे, महेश खडके, संदीप कोलते, राजू गलबले, पवन कुल्ले, मधुकर गावडे आदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.