महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा,
राज्यस्तरीय तसेच कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार,
स्वर्गीय वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. सी.पी.राधाकृष्णन
यांचे हस्ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे, महाराष्ट्र राज्याच्या कृषी सचिव जयश्री भोज, राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, आदी मान्यवरांचे उपस्थितीत नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वरळी मुंबई येथे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी भरलेल्या सभागृहात जामनेर येथील श्री रविंद्र माधवराव महाजन यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला.
श्री रविंद्र माधवराव महाजन हे 1990 पासून कृषी क्षेत्रात कार्यरत असून, अत्यंत हलक्या प्रतीच्या मुरमाड व चढ उताराच्या जमिनीचे सपाटीकरण करून, शेतातून गेलेल्या नाल्यांवर शेततळे घेऊन पाणी अडवून योग्य प्रकारे पाणलोट व्यवस्थापन केलेले आहे, शेतातील उंच टेकड्यावर पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन मोठ्या टाक्या बांधून त्या टाक्यांमध्ये पाणी भरले जाते व लाईट नसताना साठवलेल्या पाण्याचा वापर फळबागांसाठी केला जातो, फळ पिकांना पाणी देण्यासाठी ते ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर करतात,
श्री मातोश्री नर्सरी, कृषीभूषण नर्सरी, वनश्री नर्सरी,फळ संवर्धन नर्सरी इत्यादी फळ रोपवाटिका समूहाचे ते संस्थापक असून, त्यांच्या फळ रोपवाटिका समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात तसेच महाराष्ट्र राज्या बाहेर हजारो शेतकऱ्यांना मोसंबी,आंबा, लिंबू पेरू डाळिंब सिताफळ, आवळा पेरू,चिकू तसेच इतर फळ फळझाडांची जातिवंत दर्जाची कलमे व रोपे यांचा पुरवठा करून हजारो फळबागा उभ्या झालेल्या आहेत,त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे.
तसेच त्यांनी केशर आम्रपाली, रत्ना, लंगडा,चौसा,दशेरी इत्यादी आंब्याच्या झाडांची लागवड करून सदर आंबा फळांचे जामनेर तसेच परिसरात श्री मातोश्री आंबा या नावाने ब्रँड तयार करून सर्व आंबा फळे घरूनच विकतात, ते त्यांच्या शेती क्षेत्रामध्ये सतत नवनवीन प्रयोग करीत असतात, सन 2001 मध्ये आंबा आणि मोसंबी या फळपिकांचे राज्यात सर्व प्रथम घन लागवडीचे प्रयोग करून उत्पादन वाढविण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत,
शेती करत असतानाच सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकरी आत्महत्या, रासायनिक खते तसेच कीटकनाशकांच्या वापरामुळे कृषी क्षेत्राचे होणारे नुकसान, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, स्त्री भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती यासारख्या सामाजिक समस्यांवर नाट्य लेखन करून सदर नाटकाचे नाट्य प्रयोग छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान जामनेर च्या माध्यमातून सादर करून जनजागृती करण्याचे काम करत आहेत,
त्यांच्या वरील सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2022 चा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जामनेर येथील रवींद्र माधवराव महाजन यांना कृषीभूषण पुरस्कार
