तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी

पहाटेच्या सुमारास आसोदा-मुरबाड बायपासवर भीषण अपघात
जळगाव | प्रतिनिधी : आसोदा ते मुरबाड बायपास रस्त्यावर सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास तवेरा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रावेर तालुक्यातील एका शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
शांतराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तवेरा वाहनातून काही मजूर प्रवास करीत असताना आसोदा-मुरबाड बायपासवर समोरून अथवा मार्गावरील ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तवेरा वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातात शांतराम पाटील यांच्यासह रामचंद्र महाजन, ईश्वर महाजन, निखिल पाटील व चालक जितेंद्र रुपलकर हे जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शांतराम पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच �⁠जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. प्राथमिक तपासानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मृत शांतराम पाटील हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिंदखेडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.

error: Don't Try To Copy !!