भुसावळ-लोहार बसमध्ये महिलेची १५ ग्रॅम सोन्याची पोत लंपास!

जामनेर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पोत केली लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

जामनेर | प्रतिनिधी :
भुसावळ ते लोहार बसने प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जामनेर बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नोंदीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजता फिर्यादी विजय वामन पाटील (वय ४७, व्यवसाय – शेती, रा. शिवाजी नगर, जामनेर; मूळ रा. सोनाळा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे आपल्या आई सुशीलाबाई वामन पाटील यांच्यासह भुसावळ ते लोहार बसने प्रवास करीत होते.

बस जामनेर बसस्थानकात थांबली असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सुशीलाबाई यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही वेळाने पोत गळ्यात नसल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध

घटना बसस्थानक परिसरात घडल्याने पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पोलिस नोंदीनुसार, या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/९७१ प्रतापसिंग मथुरे, जामनेर पोलिस ठाणे करीत असून, तपास सुरू आहे.

error: Don't Try To Copy !!