जामनेर शहरात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांचे पेट्रोलिंग

व्यापारी व नागरिकांशी साधला थेट संवाद; कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा

जामनेर | प्रतिनिधी :

जामनेर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पेट्रोलिंग करत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला.

पेट्रोलिंगदरम्यान पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी शहरातील प्रमुख भागांना भेट देत व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी सांगितले.

पेट्रोलिंगदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांची भेट

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे या मार्गावरून जात असताना पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याठिकाणी थांबून पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या पेट्रोलिंगचे महत्त्व असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रत्यक्ष पेट्रोलिंगमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

error: Don't Try To Copy !!