उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे अत्याधुनिक ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्र दाखल!

जामनेर परिसरातील गोरगरीब रुग्णांना मिळणार अद्ययावत आरोग्य सुविधा; इतर शहरांमध्ये जाण्याची धावपळ होणार कमी

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल पडले आहे. उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे नवीन ३०० एम.ए. (300 mA) क्ष-किरण (X-Ray) यंत्र दाखल झाले असून, त्यामुळे परिसरातील रुग्णांना क्ष-किरण तपासणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे क्ष-किरण यंत्र चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे हस्तांतरित करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, एन.क्यू.ए.एस. (NQAS) नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर तसेच डॉ. दीपक जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

यंत्राच्या मंजुरीपासून ते हस्तांतरणापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे उपजिल्हा रुग्णालय, जामनेरचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. राहुल कोडवते तसेच उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारीवर्गाचेही अभिनंदन होत आहे.

गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा

या ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्रामुळे जामनेर व परिसरातील रुग्णांना आवश्यक क्ष-किरण तपासणीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तपासणीसाठी इतर शहरांमध्ये किंवा खासगी केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार असून, त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्चही वाचण्यास मदत होईल.

अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना स्थानिक पातळीवरच आवश्यक निदानात्मक तपासणीची सुविधा मिळणार असल्याने जामनेरच्या आरोग्य व्यवस्थेला यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे.

अधिकृत अभियंत्यांकडून इन्स्टॉलेशननंतर सुविधा कार्यान्वित

सदर क्ष-किरण यंत्र अधिकृत अभियंत्यांमार्फत योग्य पद्धतीने इन्स्टॉल व कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.

लवकरच भव्य लोकार्पण सोहळा

यंत्राचे इन्स्टॉलेशन व कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माननीय नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या नवीन सुविधेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय परिवाराकडून देण्यात आली आहे.

जामनेर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने ही सुविधा निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, उपजिल्हा रुग्णालय, जामनेरच्या आरोग्यसेवेला यामुळे नवी ताकद मिळणार आहे.

– उपजिल्हा रुग्णालय परिवार, जामनेर

error: Don't Try To Copy !!