✍️ विशेष लेख
आयुष्य जगत असताना एकदा तरी आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अनेकदा फक्त ती व्यक्ती असते. त्या वेळी तिची जात, धर्म, वय, पंथ यांचा विचार मनात येत नाही. कारण खरं प्रेम हे जात-धर्म पाहून होत नाही; ते फक्त मन पाहून होतं. म्हणूनच या पवित्र भावनेचा आदर राखणं आवश्यक आहे.
जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आपल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करतात, तो क्षण खरोखरच सुंदर असतो. मुळात प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे समाधान. या जगात कोणीतरी आपलं आहे, कोणीतरी आपल्याला मनापासून समजून घेतं आणि आपल्यावर प्रेम करतं, ही जाणीवच मनाला मोठा आनंद देऊन जाते. तो आनंद, ते समाधान म्हणजेच प्रेम.
भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचा आधार घेतला तर प्रेम हे मिळवण्यासाठी किंवा गमावण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहे, अशी सुंदर भावना त्यातून व्यक्त होते. प्रेम हा आयुष्यातील एक सुंदर अनुभव आहे.
मात्र प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट विवाहातच होईल असं नाही. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, तिच्यासोबत आपलं लग्न होईलच याची खात्री नसते. काही वेळा परिस्थिती, कुटुंब, सामाजिक बंधने किंवा इतर कारणांमुळे दोन व्यक्तींना एकत्र येणं शक्य होत नाही. अशा वेळी योग्य ती तडजोड स्वीकारण्याची मानसिकता असणंही गरजेचं आहे.
लग्न होणार नाही म्हणून प्रेम करणं सोडून देणं, हे त्या भावनेचा अपमान करण्यासारखं आहे. प्रेमाचा अर्थ केवळ लग्न किंवा शारीरिक सुख नसून एकमेकांच्या भावनांचा आदर, विश्वास, जिव्हाळा आणि काळजी हा आहे. त्यामुळे जोपर्यंत एखादं नातं आपल्या आयुष्यात आहे, तोपर्यंत ते मनापासून जपण्याचा प्रयत्न करायला हवा.
परिस्थिती कठीण झाली तर परिस्थितीशी तडजोड करायला शिकणं आवश्यक आहे. कारण माणसाचं आयुष्यच असं आहे की अनेक गोष्टी स्वीकारल्याशिवाय आणि काही वेळा तडजोड केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
प्रेम मिळालं नाही म्हणून आयुष्यातील आनंद संपतो, असं अजिबात नाही. ज्या व्यक्तीवर कधीतरी मनापासून प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवता येतात. तिच्यासोबत लग्न झालं किंवा नाही झालं, तरी त्या व्यक्तीबद्दल मनात आदर ठेवता येतो.
एखाद्या व्यक्तीसोबत लग्न होईल या एकाच आशेने प्रेम करू नका. प्रेम करताना समोरच्या व्यक्तीला मिळवण्यापेक्षा तिला समजून घेणं आणि तिच्या भावनांचा आदर करणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या समाजात विवाह हा अनेकदा कुटुंबाच्या संमतीने आणि परिस्थितीचा विचार करून ठरतो. त्यामुळे प्रेमविवाहाला विरोध असो किंवा परिस्थितीमुळे आलेले अडथळे असोत, प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वास्तव स्वीकारण्याची ताकदही ठेवायला हवी.
ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबत लग्न झालं तर ते नक्कीच सर्वोत्तम असेल आणि त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. पण ते शक्य झालं नाही, तर समोर येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
प्रेम टिकवण्यासाठी आयुष्यभर एक गोष्ट जपली तरी ती पुरेशी आहे—त्या व्यक्तीचा मनापासून आदर.
प्रेमाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी वेगळी असते, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. मात्र प्रेमाचं खरं सौंदर्य हे कोणाला मिळवण्यात नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्यासाठी असलेल्या भावनेचा आदर करण्यात आहे.
प्रेम करा, प्रेम जगा आणि प्रेमाचा आदर करा…! 💞



