जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील एकुलती गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गावात दारूबंदी लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
गावातील काही भागात अवैध पद्धतीने दारूविक्री सुरू असल्याने त्याचा मोठा परिणाम कुटुंबांवर आणि विशेषतः महिलांवर होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. घरातील वस्तू व धान्य विकून दारू पिण्याचे प्रकार तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दारूविक्री बंद करण्याबाबत यापूर्वीही संबंधित यंत्रणेकडे अर्ज व तक्रारी करण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने महिलांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दारूबंदीबाबत कारवाई करण्यासाठी दोन दिवसांची अल्टिमेटम देण्यात आली आहे. या कालावधीत गावातील अवैध दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर साडी-चोळी व बांगड्यांचा भेट देत आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
यासोबतच शेंदुर्णी क्षेत्रातील ‘सुतार’ नामक कर्मचाऱ्याच्या पाठबळाने हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला असून, संबंधित कर्मचाऱ्याची तातडीने पोलिस मुख्यालयात बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गावातील दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन अवैध दारूविक्रीविरोधात काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



