शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथे सौ. प्रतिभा चंद्रशेखर पाटील यांची प्राचार्य/मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
नुकत्याच आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य आर. एस. चौधरी यांनी पदभार सौ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी संस्थेचे सहसचिव दादासो यू. यू. पाटील उपस्थित होते. त्यांनी सौ. पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. पाटील यांना 30 वर्षांचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव असून, या अनुभवाचा उपयोग विद्यार्थी हितासाठी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, माजी सहसचिव कै. आप्पासाहेब पी. एस. पाटील

यांच्या संस्कारांचा तसेच वडील माजी को-ऑपरेटिव्ह ऑफिसर कै. एस. के. पाटील यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येईल.
तसेच संस्थेचे पदाधिकारी दादासाहेब गरुड, आबासाहेब भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो. गो. सूर्यवंशी व संचालक मंडळ यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे पती व किमान कौशल्य विभागाचे माजी प्राध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी संस्थेचे आभार मानले. सौ. प्रतिभा पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
