जळगाव (प्रतिनिधी) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, याचा परिणाम देशांतर्गत गॅस वितरण व्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या पॅनिक बुकिंग आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील काही गॅस एजन्सींकडून थेट कार्यालय किंवा गोडाऊनमधून सिलेंडर वितरण केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. तसेच, प्रतीक्षा यादीत फेरफार होऊन काळाबाजाराला खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या जळगाव येथील सेल्स ऑफिसरना सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाचे निर्देश पुढीलप्रमाणे :
गॅस एजन्सी कार्यालय किंवा गोडाऊनवरून थेट सिलेंडर वितरण तात्काळ बंद करावे.

सर्व ग्राहकांना केवळ ‘घरपोच’ (Home Delivery) पद्धतीनेच सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत.
वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
नियमबाह्य काम करणाऱ्या एजन्सींवर तातडीने तपासणी करून
कठोर कारवाई करावी.
या निर्णयामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने गॅस पुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य गोंधळ, काळाबाजार आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.
