ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.


कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.

नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.
गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या

सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.
जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Don't Try To Copy !!