संतापजनक प्रकाराने परिसरात खळबळ; दोन संशयित अटकेत, तिसऱ्याचा शोध सुरू
यावल | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने विहिरीजवळ नेऊन त्यांना धाक दाखवत त्रास दिल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
दहिगाव येथील पाटील गल्लीतील नामदेव रामदास पाटील (वय ५०) यांनी यावल पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान काही जण त्यांना घरातून सोबत घेऊन गेले.

यानंतर दहिगावपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नावरा रस्त्यावरील एका विहिरीजवळ त्यांना नेण्यात आले. तक्रारीनुसार, नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (वय २३) आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (वय २२) यांनी त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांना विहिरीच्या कठड्यावरून उलटे लटकवले आणि काही काळ तशाच अवस्थेत ठेवले.
या दरम्यान त्यांच्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. घटनेचे गांभीर्य एवढ्यावरच थांबले नाही. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तिसऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित
घटनेनंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने पीडित व्यक्तीची समाजात बदनामी झाल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे दहिगावसह परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
तक्रारीनंतर यावल पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कारवाई केली. या प्रकरणात नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर व्हिडिओ तयार करणारा तिसरा साथीदार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कठोर कारवाईची मागणी
दिव्यांग व्यक्तीसोबत अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.
टीप : वरील आरोप तक्रारीत नमूद माहितीनुसार असून, प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलिस तपास व न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल.
प्रतिनिधी ! कमलेश महेश्री


