वाकडी धरणातून अवैध पाणीउपसा; कारवाई करणार कोण?

धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा; रात्री-दिवस सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप

वाकडी, ता. जामनेर | दि. ७ ऑक्टोबर २०२६

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील धरणातून रात्री-दिवस मोठ्या प्रमाणावर अवैध पाणीउपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. धरणात सध्या केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने अशाच पद्धतीने पाण्याचा उपसा सुरू राहिला, तर आगामी काळात परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वाकडी धरणातून वाकडी, राहेरा, तळेगाव, कर्णफाटा आणि कासली या गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र, धरणातील पाणीसाठ्यातून विविध मार्गाने चोरट्या पद्धतीने पाणीउपसा केला जात असल्याचा आरोप होत आहे.

कारवाई होते, पण पुन्हा उपसा सुरू?

यापूर्वीही अवैध पाणीउपसा करणाऱ्यांच्या मोटारी, वायर व इतर साहित्य जप्त करून कारवाई केल्याचे सांगितले जाते. मात्र, कारवाईनंतरही पुन्हा अवैध पाणीउपसा सुरू होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, काही ठिकाणी अवैध आकडे टाकून वीज चोरी केली जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीचेही दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

मे-जूनमध्ये पाणीटंचाईची भीती

उन्हाळ्याचे मे आणि जून हे महत्त्वाचे महिने अद्याप बाकी आहेत. नागरिकांसोबतच जनावरांनाही पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा जपणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या पाणीसाठ्यातून मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल, अशी स्थिती असली तरी अवैध पाणीउपसा सुरू राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासन आता काय कारवाई करणार?

धरणातून होणाऱ्या अवैध पाणीउपशाची तातडीने पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच वीज चोरीच्या प्रकारांचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाकडी धरणाचा पाणीसाठा अनेक गावांसाठी जीवनवाहिनी असताना, या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर प्रशासन ठोस कारवाई करणार का? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Don't Try To Copy !!