जामनेर तालुक्यात संतापजनक घटना; जन्मदात्या पित्याविरुद्ध १२ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा

जामनेर : जामनेर तालुक्यात जनमाणसांना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, याप्रकरणी मुलीच्या आईने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस दैनंदिनीतील नोंदीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४ व ६५ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) मधील कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अल्पवयीन पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, प्रकरणात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

error: Don't Try To Copy !!