पिंपरी-चिंचवड : जामनेरसारख्या ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे अभिनेता ईश्वर चौधरी यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके 2026 बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात, डी.वाय. पाटील हॉस्पिटलजवळ आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

ईश्वर चौधरी यांनी गेल्या तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा सामना केला. अभिनयाची संधी मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा मुंबई आणि पुणे गाठले. छोट्या गावातून आलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

ईश्वर चौधरी यांनी ‘जब्या’, ‘अपहरण’ यांसारख्या शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत त्यांनी गुंडाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय खान्देशी चित्रपट ‘गुल्हेर’ आणि ‘गुल्हेर-2’ मध्ये त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे.

या प्रवासात अनेकदा मुंबई-पुण्याच्या फेऱ्या माराव्या लागल्या. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी अभिनय क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. अखेर त्यांच्या या मेहनतीला ‘बेस्ट अॅक्टर’ पुरस्काराच्या रूपाने मोठी दाद मिळाली.
या पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री नेहा थोरात, रिल स्टार तसेच बिग बॉस फेम प्रभू शेळके यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष श्री. गिरी एस. राज सर यांनी केले होते.
जामनेरसारख्या छोट्या ग्रामीण गावातून सुरू झालेला ईश्वर चौधरी यांचा अभिनयाचा प्रवास आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला असून, ‘दादासाहेब फाळके 2026 बेस्ट अॅक्टर’ पुरस्काराने त्यांच्या तीन वर्षांच्या मेहनतीला नवी ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागातील कलाकारांसाठी त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
