- नाथाभाऊंचे या राज्यावर मोठे उपकार आहेत. जलसंधारण मंत्री असताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि खान्देश या सर्व भागांसाठी अतिशय चांगलं काम केलं. शेतकऱ्यांना पाणी देण्याची त्यांची भूमिका राहिली. माझ्या गावाला देखील त्यांनी सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाचा प्रस्ताव त्याकाळी मंजूर करून दिला होता.सभागृहात ग्रामीण भागाचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कसे उपस्थित करायचे, संसदीय राजकारण कसं करायचं, हे नाथाभाऊंनी मला शिकवलं. गोपीनाथ मुंडे, नाथाभाऊ आणि भाऊसाहेब फुंडकर या मोठ्या नेत्यांनी आम्हाला घडवलं. मी थेट मंत्री झालो, तेव्हा फाईलवर नोट कशी लिहायची हे नाथाभाऊंनीच शिकवलं. ते राज्याचे दीपस्तंभ आहेत आणि मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन.
: जाणकार यांचे सध्या काय चाललंय?
- माझं सध्या चार राज्यांत काम सुरू आहे. कालच मी लखनौवरून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करून आलो. राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यांत मान्यता मिळाली आहे. भाजपवर बोललं की मीडिया लगेच दाखवतो, मात्र आम्ही शांतपणे बूथ पातळीपासून ब्लॉक लेव्हलपर्यंत पक्षाची ताकद वाढवत आहोत. आम्ही आता एनडीएमध्ये (NDA) नाही, स्वतंत्रपणे काम करत आहोत.
: खडसे यांच्या अमृत महोत्सवाला भाजप किंवा महायुतीचा एकही मोठा नेता उपस्थित नाही
- या कार्यक्रमात राजकारण आणायची काही गरज नव्हती. पक्षाला सत्तेत आणण्यासाठी खडसे साहेबांनी अहोरात्र कष्ट केले आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांनी तर नक्कीच यायला हवं होतं. पण ते का आले नाहीत, यावर मी भाष्य करणे योग्य नाही.
पंकजा मुंडे यांचाही दौरा अचानक रद्द
- मुंडे साहेब आणि खडसे साहेबांचे जुने घरगुती नाते होते. पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयावर मी बोलू शकत नाही. मी माझ्या पक्षाचा स्वतंत्र अध्यक्ष आहे आणि खडसे साहेबांवर माझं वडिलांप्रमाणे प्रेम आहे.
भाजपसह महायुतीचे नेते अनुपस्थित राहिले ?
- पक्षाचा काही आदेश असेल. आता आम्ही त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे त्यावर चर्चा न करता आम्ही आमचा विस्तार कसा वाढवायचा यावर लक्ष देतो. मी कोणाकडे मागणारा नाही, “I am not a demander, I am a commander.” शरद पवार, रामदास आठवले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील असे सर्व ज्येष्ठ नेते इथे आले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस
- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची सुरुवातीपासून स्पष्ट भूमिका आहे.
लक्ष्मण हाके ओबीसींनी आता एकत्र येण्याची वेळ
जरांगे यांच्यामागे ग्रामीण जनतेचे संघटन आहे. ओबीसी समाज खूप मोठा आहे, परंतु आपल्यात अद्याप तशी एकजूट आणि संघटनात्मक बांधणी दिसत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे.
सरकार आणि जरांगे यांच्यातील संवाद कमी पडतेय का?
- मंत्रिपद सोडल्यापासून मी मंत्रालयात गेलेलो नाही. त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यात काय चाललंय हे मला माध्यमांतूनच कळतं. माझं संपूर्ण लक्ष सध्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्यावर केंद्रित आहे.






8
