चोपडा | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुडगाव, ता. चोपडा; सध्या कोळंबा, ता. चोपडा) या कोळंबा येथे राहत होत्या. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.
ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या महिलेने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चोपडा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.





