जामनेर | प्रतिनिधी :
जामनेर शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला जामनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
उद्घाटन कार्यक्रमाला रणजीत जोरे, गणेश सपकाळ, शेखर सुखाडे, यादव सुखाडे, विक्रम बनोडे, दादाराव मेहे, गोपाळ सपकाळ, नितीन सपकाळ, एकनाथ सपकाळ, प्रदीप लोखंडे पंचरासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. उद्घाटनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जामनेर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.






