राजकारणाच्या पलीकडे परिवाराचे नाते महत्त्वाचे; शरद पवारांच्या उपस्थितीने अमृत महोत्सवाला मिळाला मान
भाजपमध्ये मी, राष्ट्रवादीत नाथाभाऊ; विचारधारा वेगळी असली तरी कौटुंबिक नाते कायम असल्याचे स्पष्ट
भाजप आमदार गैरहजर राहिल्याची खंत नाही; आले आणि न आलेल्या सर्व नेत्यांबद्दल रक्षा खडसेंनी व्यक्त केला आदर
बऱ्याच दिवसांपासून अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. हा अमृत महोत्सव एक परिवार म्हणून साजरा केला जात आहे. आज निखिल आपल्यात नाही, तरी प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांकडून असा उत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा असते. घरातील सदस्य म्हणून आणि निखिलच्या जागी मी आहे. नाथाभाऊंनी मला नेहमी मुलीसारखे प्रेम दिले आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे, असे मी मानते.
राजकारण वेगळे आहे आणि राजकारणाच्या पलीकडे परिवाराची एक जबाबदारी असते. त्यामुळे यावेळी सर्वांनी ठरवले की, नाथाभाऊंचा अमृत महोत्सव साजरा केला पाहिजे.
नाथाभाऊंनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, राजकारणाच्या पलीकडे सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांची ओळख आणि संबंध आहेत. अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी या व्यासपीठावर यावे आणि त्यांचा मानसन्मान व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. नाथाभाऊंसोबत अनेकांनी काम केले आहे. त्या निमित्ताने का होईना, त्यांचा उल्लेख आणि सन्मान झाला पाहिजे. याच अनुषंगाने सर्वपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे राजकारणाचा रंग देण्यात आलेला नाही. हा पूर्णपणे पारिवारिक संबंधातून आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह विविध पक्षांचे अनेक नेते या ठिकाणी आले. प्रत्येकाला ज्या वेळी सोयीचे झाले, त्या वेळी ते येथे येऊन गेले.
ही अमृतभूमी कोथळी ही आदिशक्ती मुक्ताईची भूमी आहे आणि याच भूमीत नाथाभाऊंचा जन्म झाला. त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईच्या आशीर्वादाने मी असो किंवा नाथाभाऊ असोत, आज मोठ्या पदावर राहून समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. हा मुक्ताईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे परिवारातील एक सदस्य म्हणून मी भागवत सप्ताहातही सहभागी झाले.
ऑन : भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार कार्यक्रमाला उपस्थित नाही
मला राजकारणावर बोलायचे नाही. मात्र, एवढेच सांगू इच्छिते की, मी किंवा आमच्या परिवारातर्फे प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले होते. नाथाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले आहेत. कोणी येत आहे, तर कोणी येऊन गेले आहे. त्यामुळे कार्यक्रमामध्ये राजकारणाचा कोणताही उल्लेख न करता सर्वांना निमंत्रण देण्याचे काम आम्ही केले. काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, तर काही जण प्रत्यक्ष येऊन गेले.
ऑन : शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला सत्कार
मला भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा संधी मिळाली. तीन वेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज मी केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्यांचा मला अभिमान आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन मी या घरची सून आहे. त्यामुळे या संदर्भातील माझे कर्तव्य मी नक्कीच पार पाडत आहे.
नाथाभाऊंची खूप इच्छा होती की, त्यांचा अमृत महोत्सव साजरा व्हावा. त्यामुळे परिवारातील सदस्य म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शेवटी काहीही झाले तरी हा आमचा परिवार आहे. आमचे एकमेकांशी असलेले नाते कोणापासूनही लपलेले नाही. हे सर्वांना माहीत आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मी भारतीय जनता पक्षात आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत आणि मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. त्यांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलेली आहे, तर मी भाजपची कार्यकर्ता आहे. भाजपने माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवून आम्ही हा कार्यक्रम सर्वपक्षीय ठेवला आहे, जेणेकरून सर्वांचा मानसन्मान व्हावा.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून मी एक सून आणि परिवारातील सदस्य म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी हे सात दिवस मी परिवारातील एक सदस्य म्हणून काम करत आहे.





