उज्जैन येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून चोरी; एमआयडीसी पोलिसांची २४ तासांत यशस्वी कारवाई, ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यामध्ये २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदीचा समावेश आहे.
रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील एक कुटुंब उज्जैन येथे दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घर बंद असल्याची संधी साधत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(A), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान विशाल मुरलीधर दगडे (वय २५) आणि जितेंद्र मुरलीधर दगडे (वय २७) या दोन सख्ख्या भावांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मोठ्या प्रमाणातील ऐवज हस्तगत केला. त्यामध्ये गंठन, मणी पाटली, फॅन्सी पाटली, काळमणी पाटली, टॉप्स, अंगठ्या, नथ तसेच विविध सोन्याचे दागिने आणि चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे. हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख २६ हजार ८०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळेत उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गिते आणि जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गाणपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धुमके तसेच एमआयडीसी पोलीस पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
अवघ्या २४ तासांत घरफोडीचा छडा लावत मोठ्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.




