वर्डी-अडावद रस्त्यावर वनविभागाची धडक कारवाई; सागवान तस्करीचा डाव उधळलादुचाकीवरून अवैध लाकूड वाहतूक करणारा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चोपडा | प्रतिनिधी :
चोपडा तालुक्यातील वर्डी-अडावद मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने रात्रीच्या वेळी कारवाई करत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त केले. या कारवाईदरम्यान दुचाकीवरून लाकूड वाहून नेणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करण्यात आला; मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने दुचाकी आणि लाकूड रस्त्यावरच सोडून तेथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वनपथकाला वर्डी-अडावद रस्त्यावर सागवानाच्या अनधिकृत वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वनपथकाने परिसरात गस्त वाढवून संशयित वाहनावर लक्ष ठेवले. काही वेळाने सागवानाचे अनघड लाकूड घेऊन जाणारी दुचाकी वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.
पथकाने दुचाकीचा पाठलाग सुरू करताच संशयिताने वाहन थांबवून त्यावर असलेले लाकूड रस्त्याच्या कडेला सोडले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. वनकर्मचाऱ्यांनी परिसराची तपासणी केली असता सागवानाचे मोठे ८० नग आणि लहान २० नग अनघड लाकूड आढळून आले.
वनविभागाने घटनास्थळावरून अंदाजे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि सागवान लाकूड असा एकूण ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई उपवनसंरक्षक सौरभ सहार, सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील आणि अडावद वनक्षेत्रपाल प्रशांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल योगेश सालुंखे, वनरक्षक गजानन कोईगडे, सुशांत पावरा, हर्षल जोशी, वाहनचालक राजेश जोशी, राजू पाटील तसेच अडावद राऊंड स्टाफने सहभाग घेतला.
दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयिताचा वनविभागाकडून शोध सुरू असून, जप्त केलेल्या लाकडाचा स्रोत आणि वाहतुकीबाबतही तपास केला जात आहे. सागवानाची अवैध तोड आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

error: Don't Try To Copy !!