अंकुरण्याची ताकद…

झाडाकडे पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—गळून पडणं म्हणजे संपणं नसतं.
ऋतू बदलतात, पाने गळतात, फांद्या कोरड्या पडतात; कधी वादळ झाडाची एखादी फांदी तोडून नेतं. पण त्या झाडाच्या आत कुठेतरी पुन्हा नव्याने जगण्याची ताकद जिवंत असते. योग्य वेळ आली की त्याच खोडावरून एक नाजूक हिरवा कोंब बाहेर येतो… आणि झाड पुन्हा एकदा अंकुरतं.
माणसाचं आयुष्यही यापेक्षा वेगळं नाही.
कधी एखादं नातं तुटतं, कधी विश्वासाला तडा जातो, कधी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. काही स्वप्नं डोळ्यांसमोरच विखुरतात. परिस्थिती आपल्याला अशा वळणावर आणून उभी करते, जिथे पुढचा रस्ता दिसत नाही. त्या वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो—“आता पुढे काय?”
पण निसर्गाचं उत्तर अगदी साधं असतं—
“पुन्हा सुरुवात कर.”
झाड गळून पडलेल्या पानांचा हिशोब ठेवत नाही. काल किती फांद्या तुटल्या, कोणत्या ऋतूत किती नुकसान झालं, याचा विचार करत बसत नाही. ते फक्त आपल्या मुळांवर विश्वास ठेवतं आणि योग्य वेळ येताच पुन्हा हिरवं होतं.
माणूस मात्र अनेकदा जुन्या आठवणींच्या ओझ्याखाली स्वतःलाच बांधून घेतो. कुणीतरी केलेला अपमान, मिळालेलं अपयश, तुटलेलं नातं, गमावलेली संधी… आपण सगळं मनात साठवत जातो. आणि मग हळूहळू मन कठीण होतं.
सगळ्या गोष्टी सोडून देऊन पुन्हा एकदा अंकुरणे हे झाडाला जमते;
आणि सगळ्या गोष्टी मनात ठेवून अकडणे माणसाला.
म्हणूनच कधी कधी स्वतःला थोडं मोकळं करणं गरजेचं असतं.
जे झालं ते स्वीकारणं गरजेचं असतं.
ज्यांनी सोडून दिलं, त्यांना सोडून देणं गरजेचं असतं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—स्वतःला पुन्हा एक संधी देणं गरजेचं असतं.
कारण आयुष्याची सुंदरता ही सगळं आपल्या मनासारखं घडण्यात नाही; तर जे आपल्या मनासारखं घडलं नाही, त्यानंतरही पुन्हा उभं राहण्यात आहे.
आज जर आयुष्य एखाद्या कोरड्या फांदीसारखं वाटत असेल, तरी निराश होऊ नका. कदाचित त्या शांततेच्या आत एक नवा अंकुर जन्म घेण्याच्या तयारीत असेल.
गळून पडलेलं पान झाडाची ओळख नसतं;
त्यातून पुन्हा फुटलेला कोंब ही त्याची खरी जिद्द असते.
म्हणून भूतकाळाला ओझं न बनवता अनुभव बनवा.
मनात कटुता न ठेवता शांतता निवडा.
आणि प्रत्येक नव्या सकाळीकडे एक नवी संधी म्हणून पाहा.
कारण आयुष्य किती वेळा आपण पडलो याची कथा नसते;
तर प्रत्येक वेळी आपण पुन्हा कसे अंकुरलो, याची कहाणी असते.
✍🏻 एकमन संतोष भिसे

error: Don't Try To Copy !!