शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या दिशा व संधी

‘जी.एच. रायसोनी’ महाविद्यालयात ‘ज्ञानक्षेत्र’ भेटीचे आयोजन; विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांची माहिती

शेंदुर्णी : शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या दिशा व संधी यांची सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने जी.एच. रायसोनी ज्युनिअर कॉलेज तथा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे एकदिवसीय ‘ज्ञानक्षेत्र’ भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील सर यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध शैक्षणिक पर्यायांची आणि करिअरच्या संधींची ओळख करून देण्यात आली.

या भेटीदरम्यान जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने विद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर दोन तासांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

मार्गदर्शन सत्राच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सोनल तिवारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून योग्य वेळी मार्गदर्शन मिळण्याचे महत्त्व विशद केले. मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीची दिशा चुकू नये आणि त्यांना भविष्यात योग्य निर्णय घेता यावेत, या उद्देशाने ‘ज्ञानक्षेत्र’ भेट आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयातील शिक्षक श्री. तीर्थराज इंगळे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले.

महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. रफिक शेख सर यांनी आपल्या विस्तृत ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक श्री. राहुल यादव सर यांनी न्यूटनच्या गुरुत्वीय बलाचे उदाहरण देत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ‘ज्ञानबल’ असते, ही प्रेरणादायी संकल्पना मांडली. तसेच पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध ज्ञानशाखांची ओळख करून दिली. महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. अनिल सोनार सर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.

मार्गदर्शन सत्रानंतर विद्यार्थ्यांनी दुपारची न्याहारी केली. पुढे महाविद्यालयातील आधुनिक प्रयोगशाळा, ज्ञानसमृद्ध ग्रंथालय, व्यायामशाळा आणि क्रीडांगणाची पाहणी करून तेथील शैक्षणिक व इतर सुविधांची माहिती घेतली. या प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाचा अनुभव घेण्याची आणि भविष्यातील शिक्षणाच्या संधी समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या बसेसने सर्व विद्यार्थी सुखरूप आपापल्या घरी पोहोचले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. संदीप पाटील सर यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. आर. पी. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. व्ही. डी. पाटील सर, श्री. पी. के. राजपूत सर, श्री. एस. आर. पाटील सर, श्रीमती निलिमा पाटील मॅडम आणि श्रीमती प्रियंका पाटील मॅडम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

दहावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य दिशा मिळावी, विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर व्हावा आणि त्यांना उपलब्ध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली ‘ज्ञानक्षेत्र’ भेट विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली.

error: Don't Try To Copy !!