ग्रामीण व्यथा समर्थपणे मांडणारे साहित्यिक : अशोक कौतिक कोळी!

लेखक : दिलीप देशपांडे
(जामनेर, जि. जळगाव – हल्ली मुक्काम पुणे)

ग्रामीण भागातील वास्तव, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे दुःख, वेदना, व्यथा आणि त्यांच्या ज्वलंत समस्या आपल्या कथा, कविता व कादंबऱ्यांमधून अस्सल तावडी बोलीभाषेत समर्थपणे मांडणारे साहित्यिक म्हणजे अशोक कौतिक कोळी!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनसगाव या छोट्याशा खेड्यात एका शेतमजूर कुटुंबात अशोक कोळी यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण याच ग्रामीण वातावरणात गेले. वडिलांनी आयुष्यभर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, आपल्या वाट्याला आलेले संघर्षमय जगणे मुलाच्या वाट्याला येऊ नये, या भावनेतून त्यांनी अशोक यांना शिक्षणाचा मार्ग दाखवला. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अशोक कोळी यांनीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण पूर्ण केले. एम.ए., एम.फिल. आणि पीएच.डी.पर्यंत मजल मारत डॉक्टरेट मिळवली.

घरात गरिबी, कोणताही शैक्षणिक किंवा साहित्यिक वारसा नसताना आजूबाजूच्या परिस्थितीनेच त्यांना लिहिते केले, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

वाचनातून लेखनाकडे प्रवास

गावातील छोट्याशा ग्रंथालयातून त्यांना वाचनाची गोडी लागली. पुढे अनेक साहित्यकृतींचे वाचन त्यांच्या वाट्याला आले. ‘धग’, ‘गोतावळा’, ‘गांधारी’, ‘बनगरवाडी’, ‘पाचोळा’, ‘तहान’, ‘बारोमास’ अशा विविध कथा, कादंबऱ्या आणि कवितासंग्रहांनी त्यांच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध केल्या.

साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मोठ्या साहित्यिकांशी गाठीभेटी झाल्या, संवाद घडला. गो. तु. पाटील, रंगनाथ पठारे, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांची भाषणे ऐकण्याचा आणि त्यांचे मार्गदर्शन मिळवण्याचा योग आला.

महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाने त्यांना विशेष प्रभावित केले. ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांचाही सहवास त्यांना लाभला. त्याविषयी अशोक कोळी म्हणतात, “महानोरांची पहिली भेट, प्रत्येक क्षण आणि शब्द मी मनाच्या वहीत मोरपिसाप्रमाणे जपून ठेवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि साहित्याने माझ्या मनावर पुरते गारूड केले.”

पुढे ते म्हणतात, “त्यांचा साधेपणा आणि मार्गदर्शन करण्यातली आत्मीयता, त्यांच्या हिरव्या बोलीने माझ्या पंखांत बळ आले.”

अशा प्रकारे साहित्याची गोडी वाढत असताना वाचनाकडून लेखनाकडे कधी वळलो, हे मलाच कळले नाही, असेही ते नमूद करतात.

‘कुड’ कथेला लोकमत दिवाळी अंकात प्रथम क्रमांक

अशोक कोळी यांच्या लेखनप्रवासाची सुरुवात कथा लेखनातून झाली. त्यांची ‘कुड’ ही कथा २००१ मध्ये लोकमत दिवाळी अंकातील स्पर्धेत बाराशे कथांमधून प्रथम क्रमांकावर आली.

या कथेवर परीक्षक वा. रा. सोनार यांनी दिलेला अभिप्राय विशेष उल्लेखनीय होता. त्यांनी या तरुण लेखकाच्या लेखनातील कलात्मकतेचे कौतुक करताना भविष्यात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवाव्यात, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या लेखनाची तुलना थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्याशी होणे, हेच लेखकासाठी मोठे पारितोषिक असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

शेतकरी, शेती आणि ग्रामीण वास्तव हेच लेखनाचे केंद्र

आजूबाजूचा ग्रामीण भाग, शेतकरी बांधवांचे रोजचे जगणे, शेती पिकवताना करावी लागणारी कसरत, निसर्गाचे अनियमित चक्र, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून होणारी अडवणूक, शेतमालाला योग्य भाव न मिळणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हेच त्यांच्या साहित्याचे प्रमुख विषय आहेत.

‘कुड’, ‘आसूड’, ‘सूड’, ‘उलंगवाडी’ हे कथासंग्रह, ‘पाडा’, ‘कुंधा’, ‘दफ्तर’, ‘रक्ताळलेल्या तुरी’, ‘गावाच्या तावडीतून सुटका’ या कादंबऱ्या, ‘गावाकडल्या कविता’ हा कवितासंग्रह, ‘आशानं आस व्हतं’ हा लेखसंग्रह, दोन बालकवितासंग्रह, दोन कुमार कादंबऱ्या, ‘तावडी बोली’ हे बोलीभाषेची ओळख करून देणारे पुस्तक आणि ‘ग्रामीण कथा : नवे आकलन’ हा समीक्षाग्रंथ अशा विविध साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत.

‘पाडा’ : शेतकरी कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी

‘पाडा’ ही अशोक कोळी यांची पहिली कादंबरी. केळीच्या झाडावर पूर्ण वाढ झालेला घड उतरवून बाजारात विक्रीसाठी नेण्याच्या प्रक्रियेला ‘पाडा’ असे म्हटले जाते. तापीकाठच्या शेतकरी चांगदेव तापकीर यांच्या कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी या कादंबरीतून त्यांनी मांडली आहे.

ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी ‘पाडा’ कादंबरीविषयी गौरवोद्गार काढताना म्हटले आहे की, सदानंद देशमुख यांच्या ‘तहान’ आणि ‘बारोमास’ या कादंबऱ्यांनंतर ग्रामीण शेतकऱ्याची परवड इतक्या प्रभावीपणे मांडणारी कादंबरी त्यांनी प्रथमच अनुभवली. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कादंबरीकारांमध्ये अशोक कोळी यांचे नाव निश्चितच महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘कुंधा’ : शेतकऱ्याच्या आयुष्यातील संघर्षाचे प्रतीक

‘कुंधा’ म्हणजे पिकाचा नाश करणारे गवत किंवा तण. ते केवळ पिकाचे नुकसान करत नाही, तर शेतकऱ्यालाही बरबाद करते. ते मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे लागते.

कुंधा हे केवळ शेतातील तण नसून शेतकऱ्याच्या आयुष्यातील संकटांचेही प्रतीक आहे. एका बाजूला कष्टकरी शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला सावकार, बँका, पतपेढ्या, धनदांडगे व राजकीय नेते यांच्यातील संघर्ष या कादंबरीत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यामागील कारणमीमांसा ‘कुंधा’ या कादंबरीतून लेखकाने समर्थपणे मांडली आहे.

या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ‘वि. स. खांडेकर उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

‘रक्ताळलेल्या तुरी’ : हमीभावाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी म्हणून शासनाकडून शेतमालाला हमीभाव निश्चित केला जातो. मात्र, तो वेळेवर जाहीर होईलच याची खात्री नसते. जाहीर झालेला भाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळेलच याचीही शाश्वती नसते.

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने पीक बदलून तूर पिकवणाऱ्या शेतकऱ्याची कहाणी ‘रक्ताळलेल्या तुरी’ या कादंबरीतून मांडण्यात आली आहे.

तुरीचे पीक चांगले येते. हमीभाव मिळण्याची आशा निर्माण होते. घरात आनंदाचे वातावरण पसरते. अनेक स्वप्ने पाहिली जातात. मात्र, खरेदी केंद्र कधी सुरू होते आणि कधी बंद होते, याचा काही नेम नसतो. घरात शेतमाल पडून राहतो. कर्जाचे ओझे, सावकाराचे देणे, भंगलेल्या आशा आणि आलेले नैराश्य यामुळे शेतकरी व्यसनाधीनतेकडे वळण्याची शक्यता निर्माण होते. शासनाच्या बेभरवशाच्या धोरणांचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याचे वास्तववादी चित्रण या कादंबरीत पाहायला मिळते.

‘दफ्तर’ : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे भावविश्व

शाळकरी मुलांसाठी दप्तर हा एक खजिनाच असतो. वह्या-पुस्तकांबरोबरच त्यात त्यांच्या भावना, स्वप्ने आणि आठवणी गुंतलेल्या असतात. मात्र, ग्रामीण भागातील अनेक मुलांना शिक्षण घेताना गरिबी, व्यसनाधीनता आणि कौटुंबिक समस्यांशी संघर्ष करावा लागतो.

‘दफ्तर’ या कादंबरीत ‘मिल्या’ नावाच्या मुलाचे भावविश्व साकारले आहे. स्वतःच्या अनुभवांवर आधारित लेखन असल्यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनाला चटका लावून जाते.

अशोक कोळी सांगतात, “दफ्तरमधील मिल्याप्रमाणे मीही शालेय वयात बकऱ्या चारल्या आहेत, विटभट्टीवर काम केले आहे. आई-वडील मजुरी करायचे. त्यामुळे चांगल्या दप्तरासाठी आणि शालेय वस्तूंसाठी मलाही प्रतीक्षा करावी लागली आहे. संघर्ष करावा लागला आहे.”

गरिबी आणि स्थलांतरामुळे अनेक मुलांचे शिक्षण कसे अर्धवट राहते, याचे वास्तव त्यांनी या कादंबरीतून मांडले आहे.

अनुभवांच्या वास्तवातून साकारलेल्या कथा

‘कुड’, ‘आसूड’, ‘सूड’, ‘उलंगवाडी’ हे त्यांचे कथासंग्रह, तर ‘आशानं आस व्हतं’ हा लेखसंग्रह आहे. खेड्यातील वास्तवाचे चित्र त्यांच्या कथांमधून डोळ्यांसमोर उभे राहते. कापूस आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण जीवनातील सुख-दुःख, हालअपेष्टा, शेतीच्या मशागतीपासून उत्पादित मालाचा चुकारा मिळेपर्यंत शेतकऱ्याची होणारी परवड, त्यातून निर्माण होणारे नैराश्य आणि आत्महत्येचे विचार, यांचे वास्तवदर्शी चित्रण त्यांच्या लेखनात आढळते.

प्रसिद्ध समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे म्हणतात, “अशोक कोळी हे केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारणारे कथालेखक नाहीत. त्यांनी जे पाहिले, अनुभवले तेच कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तवातील दाहकता हा त्यांच्या अनुभवविश्वाचा भाग आहे आणि तो त्यांच्या लिखाणातून दिसतो.”

तर डॉ. किसन पाटील यांच्या मते, “ही कथा केवळ कथेसाठी किंवा लेखकासाठी लिहिली गेलेली नसून जीवनजाणिवांची, ग्रामीण आत्मभानाची आणि व्यवस्थेला जाब विचारणारी ग्रामविद्रोहाची कथा आहे. खानदेशी बोली साहित्यातून उमलणारी ही कथा मातीचा गंध, मातीचा हुंकार आणि मातीचा आत्मस्वर घेऊन साकारलेली आहे.”

‘गावाकडल्या कविता’ : ग्रामीण जीवनाचा अस्सल हुंकार

अशोक कोळी यांचा ‘गावाकडल्या कविता’ हा पहिलाच कवितासंग्रह. कथा आणि कादंबऱ्यांप्रमाणेच शेती, शेतकरी, दुष्काळ, पाऊस, गावातील राजकारण, धार्मिक आणि शैक्षणिक वातावरण अशा ग्रामीण जीवनाशी निगडित विषयांना त्यांनी कवितेतून वाचा फोडली आहे.

त्यांच्या कवितांमधून ग्रामीण जीवनातील उपरोध, वेदना आणि व्यवस्थेविषयीचा संताप स्पष्टपणे जाणवतो.

झाला पंचनामा, खुष हरयाना-या
शेवटी हातात, भेटला धतु-या…

व्याज भरु भरु, मालक भिकारी
घेऊन ट्रॅक्टर, गेले अधिकारी…

उशीरा आमच्या, टकु-यात आलं
राजकारणाचं, गजकर्ण झालं…

भंगलं देऊळ, हादरला पार
मानली देवाने, काळापुढं हार…

अशा बोलीभाषेतील कवितांमधून ते ग्रामीण समाजाचे वास्तव, राजकारणातील विसंगती आणि सामान्य माणसाच्या वेदना प्रभावीपणे व्यक्त करतात.

तावडी बोलीचा साहित्यिक ठेवा

‘पाडा’, ‘कुंधा’, ‘कुड’ यांसारख्या साहित्यकृतींमध्ये त्यांनी तावडी बोलीचा प्रभावी वापर केला आहे. या बोलीभाषेचे अंतरंग, शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने त्यांनी ‘तावडी बोली’ हे पुस्तक लिहिले.

या पुस्तकातून तावडी बोलीचे भाषिक वैशिष्ट्य, शब्दसंपदा आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व उलगडले आहे. बोलीभाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात आलेले अनुभव त्यांनी ‘कडीबंदी’ या कथासंग्रहातून व्यक्त केले आहेत.

साहित्यिक योगदानाला पुरस्कारांची दाद

अशोक कोळी यांच्या साहित्यिक योगदानाची दखल विविध पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यांच्या दोन कादंबऱ्यांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘कुंधा’ कादंबरीला राज्य शासनाचा ‘वि. स. खांडेकर उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.

‘पाडा’ या कादंबरीचे आकाशवाणी जळगाव केंद्रावरून तावडी बोलीत क्रमशः अभिवाचन झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश करण्यात आला. तसेच इयत्ता चौथी आणि सहावीच्या बालभारती पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या दोन कवितांचा समावेश झाला आहे.

तावडी बोलीवरील प्रेमापोटी जामनेर येथे ‘तावडी बोली संमेलना’चे आयोजन करून त्यांनी बोलीभाषेच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

साहित्य केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाजाला जागे करण्यासाठी!

अशोक कोळी यांच्या ‘कुड’, ‘कुंधा’, ‘पाडा’, ‘रक्ताळलेल्या तुरी’, ‘आसूड’, ‘दफ्तर’, ‘कडीबंदी’, ‘डंख’, ‘भुईभोग’ अशा साहित्यकृती केवळ मनोरंजन करणाऱ्या नाहीत. त्या वाचकाला अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात आणि ग्रामीण समाजाच्या वास्तवाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवतात.

शासनाकडून अशा साहित्यकृतींचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो, ही आनंदाची बाब आहे. मात्र, केवळ पुरस्कार देऊन थांबणे पुरेसे नाही. अशा साहित्यकृतींवर व्यापक चर्चा, विचारमंथन आणि अभ्यास होणेही तितकेच आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यादानाचे कार्य करत असतानाच अशोक कोळी यांचा साहित्यलेखनाचा प्रवास सुरू आहे. ग्रामीण मातीशी असलेली नाळ, शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव आणि तावडी बोलीभाषेवरील निष्ठा यामुळे त्यांचे लेखन वेगळे ठरते.

आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी आयोजित होणाऱ्या नांदी संमेलनाच्या पाचोरा येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे, हा त्यांच्या साहित्यिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा सन्मान आहे.

ग्रामीण माणसाच्या वेदनांना शब्द देणाऱ्या, शेतकऱ्यांच्या संघर्षाला साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या आणि तावडी बोलीचा साहित्यिक ठेवा जपणाऱ्या अशोक कौतिक कोळी यांची ही साहित्यिक वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि संमेलनाध्यक्षपदी निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन!


लेखक : दिलीप देशपांडे
जामनेर, जि. जळगाव
हल्ली मुक्काम : पुणे
मो. ८९९९५६६९१७
ई-मेल : dilipdeshpande24@gmail.com

error: Don't Try To Copy !!