मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा…
चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पूर्णविचार करा, पुन्हा सक्रिय व्हा.
*जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी)
दि . २५/४/२०२५ रोजी मांडवे बु. तालुका जामनेर येथे डॉ. राजेश सोनवणे (तालुका वैद्यकीय अधिकारी जामनेर) यांच्या सूचनेनुसार व श्री.अण्णा जाधव (तालुका हिवताप पर्यवेक्षक), श्री.विक्रमसिंग राजपूत (आरोग्य सहाय्यक वाकडी) यांच्या मार्गदर्शनाखाली २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला व उपस्थित डॉ. वैभव पाटील (स.आ.अधिकारी) व श्री. हेमंत पाटील (आरोग्यसेवक) यांनी हिवतापाबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन खालील प्रमाणे केले. हिवताप हा किटकजन्य आजार असुन अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. भारतात प्लाझमोडियम व्हायव्हँक्स व प्लाझमोडियम फँल्सीफेरम हे दोन प्रकारचे रोगजंतु आढळतात. या रोगाचे प्रमुख खाद्य हे मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन आहे. या रोगजंतुमुळे हिवताप हा आजार होतो. हिवताप आजाराचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले होते व त्यावर योग्य तो उपचार माहित नसल्यामुळे त्यावेळी हिवतापामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. सर्वप्रथम सन 1889 मध्ये डाँ.सर रोनाल्ड राँस यांनी रोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे हिवतापाच्या रुग्णांवर योग्य उपचार देणे शक्य होऊन हिवतापामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी झाली. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणुन जगभरात साजरा केला जातो. हिवतापाचा प्रसार अँनाफेलीस ह्या जातीच्या डासांच्या मादींमार्फत होतो.ह्या मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यांत पाण्याच्या टाक्या,हौद,डबके,नारळाच्या करवंट्या,कुलर,टायरे,फुलदाण्या आदी ठिकाणी ही मादी अंडी घालतात.हिवतापाला रोखायचे झाल्यास डासांची उत्पत्ती रोखणे हाच रामबाण उपाय आहे.डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळुन घरातील पाण्याची भांडी घासुन-पुसुन स्वच्छ करणे, कोरडी करणे, पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकणे ठेवावी,परिसरातील पाण्याची डबकी बुजवावी अथवा त्यांत आईल किंवा राँकेल टाकावे, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावीत.आरोग्य विभागामार्फत कंटेनर्स सव्हेक्षण करुन पाण्याच्या टाक्यांमध्ये टेमीफाँस नावाचे औषध टाकले जाते. त्यामुळे डासांच्या अंडी मरुन जातात. गावात रॅली काढून हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली.
सदरप्रसंगी मांडवे बु. येथील श्री. महेमुद तडवी सरपंच, श्रीम.समीना तडवी उपसरपंच,इतर ग्रा. प. सदस्य, जि. प. शाळा मुख्याध्यापक, इतर शिक्षकवृंद, आशासेविका श्रीम.अलका जाधव, जिजाबाई पाटील, सुलोचनाबाई शिंदे व तुळसाबाई चव्हाण व गावातील नागरिक उपस्थित होते.