जामनेर | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा परिसरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन मुली यांचा या घटनेत मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास टकरेखेडा शिवारातील रेल्वे मार्गावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. धावत्या रेल्वेसमोर गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने टकरेखेडा परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, यासह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.





