ठाणे | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या रेतीबंदर खाडी परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघे मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होते. रविवारी दुपारच्या सुमारास ते रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ गेले होते. यावेळी तिघेही खाडीत पोहण्यासाठी उतरले.
मात्र खाडीतील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधमोहीम सुरू केली.
सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यात नदी, खाडी, धरणे आणि तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली असते. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
- विरार येथील रिक्षाचालक राम बच्चन चौहान हे कुटुंबासह वज्रेश्वरीजवळील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळीसाठी आले होते.
कुंडावर आंघोळ केल्यानंतर कुटुंबीय तानसा नदीच्या काठावर गेले. यावेळी अरुण चौहान (१३) आणि आयुष चौहान (१०) हे दोन्ही सख्खे भाऊ नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले. मात्र नदीच्या पाण्याची खोली लक्षात न आल्याने दोघेही बुडू लागले.
त्या वेळी आई खाऊ आणण्यासाठी बाजूला गेली होती, तर वडील रिक्षा साफ करत होते. त्यामुळे मुलांकडे त्यांचे लक्ष गेले नाही. काही वेळाने दोन्ही मुले दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केली.
स्थानिक तरुणांनी तातडीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. सुमारे तासभराच्या शोधानंतर दोन्ही भावांना नदीत आंघोळ करत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर शोधण्यात आले. त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. �




