जामनेर पोलिसांचा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका!

PI निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कडक कारवाई; कर्कश आवाजाच्या बुलेट, ट्रिपल सीट व विनालायसन्स वाहनचालकांवर नजर

जामनेर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी जामनेर पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती भिमराव बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

या कारवाईदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट, ट्रिपल सीट प्रवास तसेच विनालायसन्स वाहन चालविणाऱ्या अल्पवयीनांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

काही वाहनांमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करून मोठ्या आवाजात वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रकारच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होण्यासोबतच वाहतूक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच ट्रिपल सीट प्रवास आणि अल्पवयीनांकडून वाहन चालविण्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

“वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरूच राहील,” असा स्पष्ट संदेश जामनेर पोलिसांकडून देण्यात आला आहे.

जामनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

वाहतूक नियम पाळा… सुरक्षित प्रवास करा!

error: Don't Try To Copy !!