सण-उत्सवात जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांची अहोरात्र धावपळ

गणेश स्थापनेच्या गर्दीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे स्वतः रस्त्यावर; रात्री उशिरापर्यंत अवैध धंद्यांवरही कारवाई

जामनेर : सण-उत्सव म्हटला की सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण येते. मात्र, याच काळात नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. पोलिसांची ही धावपळ आपण अनेकदा ऐकतो; मात्र त्यामागची मेहनत प्रत्यक्ष पाहिली की पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करावासा वाटतो.

जामनेर शहरात गणेश स्थापनेच्या निमित्ताने मंगळवारी विविध ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जामनेर पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती भिमराव बोऱ्हाडे हे स्वतः रस्त्यावर उतरून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्य बजावताना दिसून आले.

एकीकडे रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडत असतानाच दुसरीकडे शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सण-उत्सवाच्या काळात नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करत असताना, पोलीस मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी घरापासून दूर असतात. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची वाट पाहत असतानाही नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यालाच प्राधान्य दिले जाते.

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच सज्जनांचे रक्षण आणि समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलीस यंत्रणा करताना दिसत आहे. जामनेर पोलिसांची ही कर्तव्यनिष्ठा आणि अहोरात्र सुरू असलेली धावपळ निश्चितच कौतुकास्पद आहे.

गणेशोत्सवातील नागरिकांचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरलेले पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांचे कार्य खरोखरच सलाम करण्यासारखे आहे.

error: Don't Try To Copy !!