गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई

हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील

पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर तसेच ग्रामीण हद्दीत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा सहभाग होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक तपासणी व झडती घेण्यात आली.

५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कृती करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली.

हद्दपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल

पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

११ अजामीनपात्र वॉरंट तामील

न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) पोलिसांनी यशस्वीरीत्या तामील केले. त्यामुळे प्रलंबित आरोपींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

अवैध दारू विक्रीवर धाड

पोलिसांनी प्रोहिबिशन रेड अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई

मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तर आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली.

पोलिसांचा स्पष्ट इशारा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाचोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पोलिसांचे पेट्रोलिंग यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Don't Try To Copy !!