महापौर पदासाठी ५०८ हनुमान चालीसा पठणाचा संकल्प पूर्णअॅड. प्रकाश पाटील यांच्या उपक्रमाची जामनेर तालुक्यात चर्चा

जामनेर (प्रतिनिधी) — शिवसेनेचे जामनेर तालुकाप्रमुख अॅड. प्रकाश पाटील यांनी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळून महापौर पद मिळावे, या हेतूने ५०८ वेळा हनुमान चालीसा पठणाचा संकल्प केला होता. हा संकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने जामनेर तालुक्यात या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

बुधवार, ७ जानेवारी रोजी अॅड. प्रकाश पाटील यांनी जामनेर शहर परिसरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये जाऊन या संकल्पास सुरुवात केली. सलग पाच दिवस त्यांनी भक्तिभावाने ५०८ वेळा हनुमान चालीसा पठण केले. रविवार, ११ जानेवारी रोजी हा धार्मिक संकल्प पूर्ण करण्यात आला.

शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित राजकीय यश लाभावे, तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक परिवर्तन घडावे, या सद्भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अॅड. प्रकाश पाटील यांनी सांगितले.

error: Don't Try To Copy !!