छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

बोदवड (प्रतिनिधी) – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेची जाणीव विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त करत एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मिठूलालजी अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. विकासभाऊ कोटेचा प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरविंद चौधरी यांनी

मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा उल्लेख केला. समाजहितासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य युवकांनी करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. रक्तदानाचे वैज्ञानिक, सामाजिक व आरोग्यविषयक महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, रक्तदानामुळे शरीरातील रक्तनिर्मिती प्रक्रिया सक्रिय राहते आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची मदत मिळते. शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने पार पाडली. डॉ. कृष्णाई सोळंकी, डॉ. विद्या शिरसाट तसेच तंत्रज्ञ श्री. सागर पाटील, श्री. दीपक होनमाने, श्री. प्रदीप पाडवी, श्री. प्रभाकर पाटील व श्री. जगन्नाथ जाधव यांनी अत्यंत दक्षतेने रक्तसंकलन प्रक्रिया पूर्ण केली. सर्व रक्तदात्यांची पूर्वतपासणी करून वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील यांनी केले. आयोजनासाठी डॉ. मनोज निकाळजे, प्रा. अजित पाटील, प्रा. तुषार सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर, प्रा. अखिलेश यादव, प्रा. शुभम चौधरी, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वंदना नंदवे व श्री. अतुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

रा.से.यो. स्वयंसेवक दीक्षा कोकाटे, दिव्या चौधरी, दिव्या वंजारी, रुची धांडे, संजना धांडे, प्राजक्ता दांदडे, अक्षय कोकाटे यांनी नोंदणी, नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदान दिले. शिबिराच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमातून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची जिवंत अभिव्यक्ती आहे. युवकांनी वाढदिवस, जयंती किंवा राष्ट्रीय सण अशा विशेष प्रसंगी रक्तदान करून समाजाशी असलेली नैतिक बांधिलकी जपावी, असे आवाहन प्रा. नितेश सावदेकर यांनी केले.

error: Don't Try To Copy !!