शेंदूर्णी (दि. १९ फेब्रुवारी २०२६) – शेंदूर्णी येथील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक श्री व्ही. बी. पाटील सर होते. प्रारंभी अध्यक्ष तसेच श्री दीपकभाऊ परदेशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत सर यांनी केले.
जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदर्शी राज्यकारभाराविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थिनींनी गीतगायनातून महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला.
उपशिक्षक श्री आर. एस. चौधरी सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांची थोरवी वर्णन केली व कवितेद्वारे मानवंदना दिली. अध्यक्षीय भाषणात
श्री व्ही. बी. पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडत त्यांच्या आदर्श राज्यपद्धती, सर्वधर्मसमभाव व लोककल्याणकारी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एस. पाटील मॅडम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एस. एम. भुरट सर व श्रीमती व्ही. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे. एम. नाईक सर यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
