शेंदूर्णी सूतगिरणीला गती देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.
बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.
सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

error: Don't Try To Copy !!