रांजणी, प्रतिनिधी — रांजणी येथे विजेच्या लोंबकळलेल्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील ज्वारीच्या गंजीला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी कौसल्याबाई जगदेव मगरे यांच्या शेतातील नुकतीच कापणी करून पुंज मारून ठेवलेली ज्वारी पूर्णपणे जळून खाक झाली.
दुपारच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून ज्वारीच्या गंजीने पेट घेतला. आग वेगाने पसरल्याने शेतमाल वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
हाता-तोंडाशी आलेला घास आगीत जळाल्याने मगरे कुटुंबावर
आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीसाठी मोठ्या मेहनतीने व खर्च करून तयार केलेला माल काही क्षणांत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, परिसरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले असून तारा लोंबकळत असल्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडली आहे. अशा धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यातही अशा दुर्घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केवळ वीजबिल वसुलीवर भर देणाऱ्या वीज वितरण विभागाने तातडीने दुरुस्ती व देखभाल कामे करावीत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
