बोदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईदगाह परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीला अद्याप सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे.
शहर विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, संबंधित विहिरीत भविष्यात एखादा प्राणी किंवा पक्षी पडल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

यापूर्वी सारोळा पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत बैल पडून मृत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विहिरीवर त्वरित सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी करत शहर विकास आघाडीने नगर पंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शहरभर “भीक मागो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत नगर पंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
